पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील वाहतुकनगरीमधील वाहनतळ 11 महिने कराराने एका एजन्सीला देण्याचा ठराव स्थायी समितीने केला आहे. ठराव नियमबाह्य असून, तो रद्द करावा, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
वाहनतळासाठी पालिकेच्या भूमि आणि जिंदगी विभागाने निविदा प्रक्रिया राबविली होती. अकरा महिने कालावधीसाठी 38 लाख 50 हजार दराची निविदा होती. त्यासाठी तनिष्क एंटरप्रायजेसची 51 लाख 20 हजार 450 ही सर्वांधिक दराची निविदा पात्र ठरली आहे. त्या एजन्सीला काम देण्यास स्थायी समितीने 16 डिसेंबर 2020 च्या सभेत मान्यता दिली आहे.वाहनतळाची जागा भाडे दराने देण्यासाठी योग्य प्रकारे निविदा राबविण्यात आलेली नाही. राजकीय नेत्यांच्या दबावामुळे स्थायी समितीने त्यास मंजुरी दिली आहे, असा आरोप काळभोर यांनी केला आहे.
दरम्यान, अधिक दराने निविदा भरल्याने त्यांचा फटका मालवाहतूक करणार्या वाहनचालकांना बसणार आहे. त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पार्किंग शुल्क वसुल केले जाणार आहे. त्यामुळे मालवाहतुकीवर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे ती निविदा रद्द करावी, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.