पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
भारतीय जनता पार्टी केंद्र व प्रदेश यांच्या सुचनेवरून नमो चषक 2024 क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रथमच पिंपरी विधानसभा मतदार संघात करण्यात आले आहे. विविध खेळांच्या या स्पर्धाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार हिंगे व क्रीडा प्रकोष्ट जयदीप खापरे तसेच, आमदार उमाताई खापरे यांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाशेजारील मैदानात रविवारी (दि.7) सायंकाळी 5 ला होणार आहे. तत्पूर्वी ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील.
नमो चषक 2024 स्पर्धेत व्हॉलीबॉल, लॉन टेनिस बॉल, कॅरम, क्रिकेट, जिम्नॅस्टिक, बॉक्सिंग, कबड्डी, रायफल शूटींग, बास्केटबॉल, हॅण्डबॉल या विविध खेळांच्या समावेश आहे. या स्पर्धा विविध मैदानावर आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांमध्ये राज्य, जिल्हा व पिंपरी-चिंचवड शहरातील खेळाडू सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य क्रीडा संघटना आणि पुणे जिल्हा क्रीडा संघटनेच्या मान्यतेने या स्पर्धा घेण्यात येत आहेत. तसेच, विविध शाळांमधून चित्रकला, नृत्य, क्रीडा व एकांकिका या स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तुषार हिंगे व क्रीडा प्रकोष्ट जयदीप खापरे यांनी दिली.