पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
क्रांतिकारक शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त वंदे मातरम संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 109 तरूण, तरूणी, महिला तसेच, पोलिस कर्मचार्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. रक्तदात्यांना भारतमाता व संविधानाची प्रस्ताविका असलेली प्रतिमा आणि प्रमाणपत्र भेट देण्यात आले.
खडकी येथील श्रीराम मंदिर सभागृह येथे झालेल्या शिबिराचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे व संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे यांच्या हस्ते क्रांतिकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य दुर्योधन भापकर, माजी नगरसेविका अॅड. संगीता गवळी, पोलिस निरीक्षक आनंद साळवी, योगेश जाधव, संघटनेचे प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा, शरद रोच, वैभव वाघ, डॉ. मालोजी गादेवार, बाळासाहेब आहेर व विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. पीएसआय रक्तपेढीचे मिलिंद भुजबळ यांचे सहकार्य लाभले.
विभागाध्यक्ष शिरीष रोच यांनी प्रास्ताविक केले. राजेश काकडे यांनी सुत्रसंचालन केले. प्रतीक परदेशी यांनी आभार मानले. शिबिर यशस्वीतेसाठी राजेश राजपुत,आशिष आगरवाल, आनंद रेड्डी, करण चव्हाण, दीपक चार्य, विकी सारसर, राम साठे, विनोद काळे व सदस्यांनी सहभाग घेतला.