महापालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
निर्भीड न्यूज –
नाशिकफाटा – कासारवाडी येथील उड्डाणपुलाचा पुण्याच्या दिशेने उतरणारा एकेरी मार्ग असणारा रॅम्प वाहतुकीस खुला करण्यासाठी शिवसेनेने गुरुवार, दि. 7 एप्रिल रोजी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी रॅम्पची प्रत्यक्ष पाहणी केली. हा रॅम्प वाहतुकीसाठी तातडीने खुला करण्याचे आदेश वाहतूक पोलिस, महापालिका अधिका-यांना दिले. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, उतारावर गतिरोधक बांधावेत आणि रॅम्प खुला करावा, अशा विविध मागण्या शिवसेनेने केल्या. येत्या आठवड्याभरात रस्तेसुधारणा करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.
शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडीच्या शहरसंघटक सुलभा उबाळे यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शहरसंघटक नंदकुमार सातुर्डेकर, सल्लागार भगवान वाल्हेकर, मधुकर बाबर, विधानसभा प्रमुख योगेश बाबर, गजानन चिंचवडे, धनंजय आल्हाट, शहर उपप्रमुख शाम लांडे, किसन तापकीर, उल्हास कोकणे, समन्वयक रोमी संधू, माधव मुळे, वसंत भोसले, नगरसेवक संपत पवार, विमल जगताप, संगीता पवार, माजी नगरसेवक विजया जाधव, गीताराम मोरे, विभागप्रमुख हरेश नखाते, खंडू शिरसाट,राजेश वाबळे, तुषार नवले, सागर पाचर्णे, शंकर कु-हाडकर, चंद्रकांत शिंदे, दीपक गाढवे, सोनू परदेशी, सुधाकर नलावडे, भाविक देशमुख, सुखदेव नरळे, नाना काळभोर, सोमनाथ गुजर, ज्ञानेश्वर शिंदे, विशाल कलाटे, मारुती दाखले, अॅड. सुनील ओव्हाळ, युवा सेनेचे अमित गावडे, सचिन सानप, राकेश वाकुर्डे, अमित शिंदे, सुनील समगीर, महिला आघाडी जिल्हासंघटक सुशीला पवार, स्वरुपा खापेकर, मंगला घुले, उज्ज्वला ढोरे, सुधा नाईक, संगीता उत्तेकर, सुनंदा सावंत आदी उपस्थित होते.
पिंपळे – गुरवकडून येणा-या वाहनांना नाशिक फाटा चौकात प्रवेश मिळण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता (रॅम्प) मागील दीड वर्षांपासून वापराविना पडून आहे. महापालिका प्रशासनाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष असले, तरी परिसरातील दारुड्यांनी या रस्त्याचा वापर ‘ओपन बार’ म्हणून सुरू केला आहे. या प्रश्नावर शिवसेनेने आवाज उठवला. शिवसेना नगरसेवक संपत पवार, धनंजय आल्हाट यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना निवेदन देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले. पिंपळे – गुरवकडून येणा-या वाहनांना नाशिक फाटा चौकात प्रवेश मिळावा, यासाठी हा रस्ता (रॅम्प) तयार करण्यात आला. रस्त्याचे काम पूर्ण होऊनही रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यास प्रशासनाला मुहूर्त का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला; तसेच प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीस खुला न केल्यास शिवसेनेच्या वतीने उद्घाटन करून नागरिकांसाठी रस्ता खुला करण्यात येईल, असा इशारा दिला.
त्यानुसार शिवसैनिकांनी आज सकाळीच या रस्त्यावर धडक दिली. ‘रस्ता आमच्या हक्काचा… नाही कोणाच्या बापाचा’, ‘गलथान नियोजन करणा-या राष्ट्रवादीचा धिक्कार असो’, ‘अधिका-यांचं करायचं काय… खाली डोकं वर पाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यानच्या काळात आयुक्त राजीव जाधव यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शफील पठाण यांच्यासह प्रमुख अधिकारी, पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्तांनी शिवसेनेची भूमिका समजावून घेत वाहतुकीसाठी रॅम्प तातडीने खुला करण्याचे आदेश दिले. अपघात होऊ नये यासाठी रॅम्पच्या उतारावर गतिरोधक उभारावेत, सिग्नल यंत्रणाही उभारा, अशी सूचना सुलभा उबाळे यांनी केली. शिवसेनेची ही मागणी रास्त असून, त्याची येत्या आठवड्याभरात पुर्तता करू, असे आश्वासन आयुक्त जाधव यांनी दिले. त्यानंतर शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.