निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. ज्यांच्या पिढ्यान् पिढ्यांनी सामान्य नागरिकांवर दहशत माजवून आपली पोळी भाजून घेतली त्यांना दहशतीबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकारी नाही, तसेच चूकांवरती पांघरून घालण्याचा कलाटेंचा केविलवाणा प्रयत्न असा गंभीर आरोप माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी केला आहे.
वाकड-पुनावळे प्रभागातील सहा कामांचे भूमीपूजन करण्यासाठी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी राजकीय खेळी केली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर मात करण्याच्या उद्देशाने महापौर नितीन काळजे यांनाही गंडवून त्यांच्याच हस्ते कलाटे यांनी या कामांचे भूमीपूजन केले. त्यावरून महापालिकेत राजकारण रंगले असून, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर सोमवारी टिका केली. त्याला माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शेखर ओव्हाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “राहुल कलाटे हे स्वतः केलेल्या नियमबाह्य चुका लपवण्यासाठी भाजपवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. कलाटे यांचे जेवढे वय आहे, तेवढा आमदार लक्ष्मण जगताप यांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे सवंग प्रसिद्धीसाठी कलाटे हे आरोप करत आहेत. विकासाच्या नावाखाली आपल्या प्रभागातील जनतेला वेठीस धरणाऱ्या राहुल कलाटे यांनी आधी महापालिकेची विकासकामे कशी करावी लागतात त्याचे धडे गिरवावेत.
राहुल कलाटे हे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत संगनमत करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. कलाटे यांनी त्यांच्या प्रभागामधील कामे अधिकाऱ्यांना धमकी देऊन त्यांच्यावर दहशत माजवून बंद करण्यास भाग पाडले आहे. प्रभागातील नागरिकांनाही कलाटे यांच्या दहशतीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.”