निर्भीडसत्ता न्यूज –
कोणत्याही प्रकारची परिस्थिती शिक्षणाच्या आड येत नसते. ध्येय निश्चित असेल, तर प्रयत्नांची जोड देऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते, असे मत तहसिलदार सागर ढवळे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन नुकतेच तहसिलदार सागर ढवळे, नगरपालिका मुख्याधिकारी श्रीराम पवार, पॅसिफिक अकॅडमीचे प्रमुख प्रशांत फड यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते ढवळे बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रमुख प्रा. विलास कुमावत, उपप्राचार्य डॉ. प्रमोद बोत्रे, उपप्राचार्या प्रा. संजीवनी पाटील, प्रा. संदीप शिंदे, प्रा. विठ्ठल शिंदे, अमोल गव्हाणे आदी उपस्थित होते.
श्रीराम पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी कशी करावी आणि राज्य सेवा पूर्व परीक्षेची माहिती सविस्तर सांगितली. प्रशांत फड यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येतात. त्या संधीचे सोने करा, अभ्यास, परिश्रम, चिकाटीमुळे यश निश्चितच मिळते, असे मार्गदर्शन केले. डॉ. संजय मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले. तर, डॉ. दिनकर मुरकुटे यांनी आभार मानले.