निर्भीडसत्ता न्यूज –
थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण दशरथ आरडे यांच्यावर उपचार न करता त्यांना पैशासाठी डांबून ठेवले. पोलिसांनी सुटका केल्यानंतर त्यांच्यावर चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी (दि. 26) रात्री त्यांचे निधन झाले. बिर्ला रुग्णालयाच्या ‘सीईओ’ रेखा दुबे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी तणावाचे वातावरण होते.
दशरथ आरडे (वय 72) असे असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराचे 86 हजार रुपयांचे बिल रुग्णालयाने त्यांना दिले. आरडे कुटुंबिय गरीब असल्यामुळे त्यांनी एवढी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली. आपण दारिद्र्य रेषेखाली मोडत असल्यामुळे हे बिल माफ करावे, अशी मागणी त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे केली. दारिद्र्य रेषेखाली मोडत असल्याचे पुरावेही त्यांनी दिले. परंतु, रुग्णालयाने बिल माफ करण्यास नकार देत, त्यांना डांबून ठेवले. आरडे कुटुंबियांनी वाकड पोलिसांत धाव घेऊन लेखी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची सुटका केली. त्यानंतर आरडे यांना चिंचवड येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या वेळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे व इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे. काही कुटुंबियांनी वाकड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला असून, आता पोलिस काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.