निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पिंपरी-चिंचवड शालेय कबड्डी स्पर्धेत विजयी संघाच्या खेळाडूंना पराभूत संघाचा खेळाडूंसह क्रीडा शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे या स्पर्धाही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी सुमारे 40 ते 45 विविध खेळांच्या स्पर्धा घेते. या स्पर्धा शहरातील वेगवेगळ्या भागात भरविल्या जातात. यंदा पिंपरी-चिंचवड शहर शालेय कबड्डी स्पर्धा भोसरीतील महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर सुरू आहे. त्यातील 17 वर्षांखालील मुलांचा अंतिम सामना शुक्रवारी (दि.7) झाला. हा सामना महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालय संघाने जिंकला. भोसरी येथील पराभूत संघाचा खेळाडूंनी आणि क्रीडा शिक्षकाने विजय संघाचा खेळाडूंना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तरीही, संबंधित संघाविरूद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
मैदानातील पंचांनी व उपस्थित क्रीडा शिक्षकांनी मध्यस्थी करीत संबंधित खेळाडू व क्रीडा शिक्षकांना शांत केले. या प्रकारचा घटना आता शालेय क्रीडा स्पर्धेत नव्या राहिल्या नाहीत. पराभूत झाल्यानंतर शिवीगाळ आणि मारहाण करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी पुढे येत आहे. तसेच, या प्रकारचे कृत्य करणार्या संघांवर कडक कारवाईची मागणीही होत आहे.
या संदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी विजय संतान यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर, पालिकेचे क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे यांनी सदर प्रकार माहित नसून, सुटीवर असल्याचे सांगितले. तर, क्रीडा प्रबोधिनी विद्यालयाचा शिक्षकांनी बोलण्यास नकार दिला.