निर्भीडसत्ता न्यूज-
तळेगाव, दि. 10 (प्रतिनिधी) – सच्चा कार्यकर्ता, समाजाच्या विकासाकरिता स्वतःला झोकून देणारा, निर्भीड व स्पष्ट बोलणारा, कामातील धडाडी दाखवणारा यासोबतच माय भगिनींची काळजी घेणारा संवेदनशील माणूस..अशा विविध पैलूंचे दर्शन घडवलेल्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळकेंची मावळमधील तरुणाईवरही भुरळ पडली आहे. मतदारसंघातील विविध गावांमधून प्रचारदौरा करणाऱ्या शेळकेंबरोबर सेल्फी घेण्यासाठी तरुणाईची अक्षरशः झुंबड उडाली होती.
राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार सुनील शेळके यांनी अर्ज माघार घेण्याच्या दिवसापासूनच झंझावाती दौरा सुरु केला होता. पवन मावळ, आंदर मावळ भागातील पाडे-वस्त्या, गावे त्यांनी कार्यकर्त्यांसह पिंजून काढली. गावा-गावातून सुनील अण्णांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी, मिरवणूक, माय-भगिनींकडून औक्षण, ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांकडून शेळके यांचे आनंदात स्वागत झाले. सुनील शेळकेंनी ठिकठिकाणी भाषणे केली. मतदारांशी सुसंवाद साधला. त्यांची आपुलकीने विचारपूस केली. या सर्व वातावरणात एक दृश्य जागोजागी हमखास दिसले. ते म्हणजे सुनिल अण्णा जिथे जातील, तिथे तरुण-तरुणींची त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उडालेली झुंबड !
मावळ तालुक्यात सुनील अण्णांनी केलेली विकासकामे सर्वश्रुत आहेत. त्यामुळे ते कोणत्याही पक्षात जावो, आमचे मत अण्णांनाच असे मत व्यक्त करणारे असंख्य मतदार या दौऱ्यात भेटले. कारण केलेली कामे लपत नाहीत. नगरसेवक असतानाही समाजासाठी तळमळीने काम करणारे, प्रसंगी स्वखर्चातून पैसे काढून काम करणारे शेळके यांच्याबद्दल मावळच्या मतदारांना प्रचंड आपुलकी आहे. तरुणवर्गातही त्यांच्या धडाडीबाबत ‘क्रेझ’ आहे. त्यांच्या बेधडक, आक्रमक आणि प्रसंगी हळव्या भाषणांची भुरळ तरुणाईवरही तितकीच पडते आहे. जे आहे ते रोखठोक बोलणारे सुनील अण्णा त्यामुळेच मावलमधील तरुण वर्गाचे ‘हिरो’ ठरत आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये !