निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
महापौर चषक ‘टिन 20’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रूपीनगर माध्यमिक विद्यालय संघाने अभिषेक विद्यालयाचा 5-0 गोल फरकाने एकतर्फी पराभव करीत 17 वर्षे मुलींच्या गटात विजेतेपद प्राप्त केले. तर, ग्लोबल स्कूल संघाने टाटा मोटर्स विद्यानिकेत स्कूल संघाचा 3-0 गोलफरकाने पराभव करीत 14 वर्षे मुलींमध्ये विजेतेपद मिळविले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्पर्धा मासुळकर कॉलनी, पिंपरी येथील डॉ. केशवराव हेडगेवार मैदान येथे संपली. सतरा वर्षे मुलींच्या अंतिम लढतीत विजयी रूपीनगर विद्यालयाच्या निशा पानसे हिने 2 गोल केले. तर, अनुजा क्षीरसागर, सानिया शेख व महेक शेख यांनी प्रत्येकी 1 गोल करीत तिला साथ दिली. रूपीनगर विद्यालयाच्या भक्कम बचाव फळीमुळे प्रतिस्पर्धी अभिषेक विद्यालयास एकही गोल नोंदविता आला नाही. ग्लोबल स्कूलने तिसरा क्रमांक मिळविला.
चौदा वर्षे मुलींच्या अंतिम सामन्यात विजयी ग्लोबल स्कूलकडून निवती आगरवाल हिने 3 गोल नोंदवित हॅट्रटिक नोंदविली. तिने विजयात सिंहाचा वाटा उचलला. प्रतिस्पर्धी टाटा मोटर्स विद्यानिकेत स्कूलला एकही गोल करता आला नाही.