ठाणे । निर्भीडसत्ता न्यूज
मुंब्र्यात अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणुन एका गर्भवती महिलेला आपला प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान या महिलेला उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्यानंतर ती महिला ज्या रिक्षातून रुग्णालयासाठी वण वण फिरत होती तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या महामारीतही खासगी रुग्णालयांची मुजोरी वाढत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
माहितीनुसार या महिलेला पोटात त्रास होऊ लागल्यानं तिचे कुटुंबिय रुग्णालयात दाखल करण्याकरता घेवून गेले असता तीन रुग्णालयांनी या गर्भवती महिलेला दाखल घेण्यास नकार दिला. अखेर रिक्षातच या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. एकीकडे महामारीशी लढण्यासाठी ठाण्यात हजारो खाटांचे रुग्णालये उभारले जात आहेत. याच ठाण्यात मात्र गर्भवती महिलेला उपचाराअभावी मृत्यू होणे म्हणजे ठाण्यातील आरोग्य व्यवस्था किती ढिसाळ झालीये हे स्पष्ट होतय. या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेने मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे.