पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा सोमवारी (दि.6) कोरोनाने कहर केला. एकाच दिवशी तब्बल 581 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने शहराची चिंता वाढली आहे. तर, कोरोनामुळे तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, 363 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील कोरोनाबाधितांची आजची सर्वांत मोठी संख्या आहे. त्यामुळे कोरोनाचा संक्रमणचाा वेग वाढल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील सर्वच भागांतील विशेषत: दाट लोकवस्ती व झोपडपट्टी भागांतील अधिक रूग्ण आहेत.
वायसीएम, भोसरी, इतर व खासगी रूग्णालयात 1 हजार 863 जणांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 11 रूग्ण उपचार घेत आहेत. शहरातील आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 965 वर पोहचली आहे.
तर, पिंपरीतील बौध्दनगर येथील 64 वर्षीय पुरूष, चिखलीतील हरगुडे वस्तीतील 50 वर्षीय पुरूष आणि चाकणमधील 55 वर्षीय पुरूषांचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला.
एकूण 363 कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत बरे होणार्यांची संख्या 3 हजार 138 आहे. तर, आज एकूण 614 कोरोना संशयितांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज 505 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. एकूण 1 हजार 392 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.