पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड कोरोनो विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी आठवड्याच्या दर गुरुवारी आणि रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत स्वत:हून जनता कर्फ्यूचे पालन करावे. घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.
यासंदर्भात महापौर माई ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “गेल्या चार महिन्यापासून डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महापालिका प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था कोरोना विरोधात लढा देत आहेत. कोरोना हद्दपार करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. हा लढा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूचे गंभीर संकट दूर करण्यासाठी व त्याला आळा घालण्यासाठी शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी जनता कर्फ्युमध्ये स्वत:हून पाळणे गरजेचे आहे.
शहरातील सर्व कारखानदार, खाजगी अस्थापना, घाऊक व किरकोळ मालाचे व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, भाजी मंडई चालक, मटण व मांस विक्रेत्यांनी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी आठवड्याच्या दर गुरुवारी आणि रविवारी आपली दुकाने, अस्थापना स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावेत. जनता कर्फ्यूचा उद्देश साध्य होण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे. तसेच शहरातील नागरिकांनीही दर गुरुवारी व रविवारी अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. अन्यथा संपूर्ण दिवसभर घरीच रहावे. तसेच स्वत:ची काळजी घ्यावी व इतरांचीही घ्यावी, असे कळकळीचे आवाहन महापौर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी केले आहे.