- पेट्रोल पंपावर नागरिकांना इंधन नाही; महापालिका आयुक्तांचे आदेश
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात सोमवार (दि.13)च्या मध्यरात्रीपासून ते 23 जुलै असे दहा दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सुरूवातीचे पाच दिवस केवळ दूध विक्री, रूग्णालय, दवाखाने व औषध दुकाने सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंपावर नागरिकांना इंधन दिले जाणार नाही. भाजी, फळ, मटन, चिकण, मासे विक्री, दुकाने, व्यवहार, कार्यालये, इतर सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद राहणार आहे, असे आदेश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी (दि.12) दिले आहेत.
लॉकडाऊनमध्ये दूध वितरण व विक्री करता येणार आहे. रूग्णालय व औषध दुकाने सुरू राहतील. कंपनी संचलित पेट्रोल पंप सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना इंधन दिले जाणार आहे. खासगी संचलित पंप बंद राहतील. गॅस सिलिंडर वितरण सुरू राहिल. वृत्तपत्र कार्यालय सुरू राहतील. वृत्तपत्र वितरण सकाळी करता येईल. बँक सुरू राहतील. मात्र, ग्राहकांना बँकेत जाता येणार नाही.
माल वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, टे्रलर, टॅक्टर वाहने बंद राहतील. बांधकामाच्या ठिकाणचे कामे बंद राहतील. मात्र, बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची निवास व्यवस्था असेल, तर तेथे काम करता येईल. जीवनाश्यक वस्तू, औषधे, तयार अन्नपदार्थ घरपोच वाटप सकाळी 8 ते रात्री 10 या कालवाधीत पालिकेची पूर्वमान्यता घेऊन करता येणार आहे. सर्व आस्थापनाप्रमुखांनी आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
कारखाने व उद्योग सुरू राहणार आहेत. तेथे ये-जा करण्यासााठी कामगारांना चारचाकी वाहन किंवा बसमधून प्रवासाला परवानगी आहे. पालिकेने या पूर्वी दिलेले सर्व पास रद्द करण्यात आले आहेत. शहराअंतर्गत आवश्यक ते पास पालिकेकडे अर्ज करून प्राप्त करता येतील. तर, शहराबाहेरील पासकरीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडे अर्ज करावेत, असे आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे. विनाकारण फिरत असल्यास चारचाकी व दुचाकी वाहन जप्त करण्यात येणार आहे. वाहन परवाना रद्द करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविला जाणार आहे
भाजी, फळ, मटन, चिकण, मासे विक्री रविवारपासून सुरू होणार
किराणा दुकाने, भाजी व फळ, मटन, चिकण, अंडी, मासे यांची दुकाने, किरकोळ व ठोक विक्री, व्यापार, दुकाने व उद्योग, बाजारपेठ, ई-कॉमर्स मंगळवार (दि.14) ते शनिवार (दि.18) पर्यंत पूर्णपणे बंद राहतील. रविवार (दि.19) ते गुरूवार (दि.23) या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने, भाजी व फळ, मटन, चिकण, अंडी, मासे तसेच, ठोक विक्रेत्यांची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत उघडी राहतील. तसेच, ई-कॉमर्सचे व्यवहार सुरू होतील. उर्वरित इतर सर्व दुकाने व बाजारपेठ पूर्णपणे बंद राहतील. सार्वजनिक, खासगी मैदान व क्रीडांगणे, हॉटेल, मॉल, लॉज, सलून व ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहे. सार्वजनिक व खासगी दोन, तीन व चारचाकी वाहनांतून वाहतूक, बस वाहतूक बंद असणार आहे. ऑनलाईन फु्रड डिलिव्हरी आदी बंद राहणार आहे.