पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती योजना विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ महिला, विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा. त्यामुळे महिला सक्षमीकरण व सबलीकरणास चालना मिळणार आहे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते नगरसेवक एकनाथ पवार यांनी शुक्रवारी (दि.30) केले.
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रभाग क्रमांक 11 येथील शरदनगर येथे झालेल्या कार्यक्रमात भगवती महिला सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन एकनाथ पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
एकनाथ पवार म्हणाले की, महिला बचत गटाच्या माध्यमातून पुढील काळात आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत. त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व सबलीकरण केले जाईल. महिला बचत गटांना महापालिकेच्या माध्यमातून विविध व्यावसायिक उपक्रमाशी जोडले जाणार आहे.