पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
शहरातील पिंपरी चौकात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असल्याने महापालिकेने तेथे लावलेली फुफ्फुसाची प्रतिकृती काळी पडली आहे. केवळ 20 दिवसांत पांढर्या रंगाचे फुफ्फुस काळे झाले आहे. त्यामुळे वातावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याचे स्पष्ट होत आहे.
हवेतील प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व हवेची दैनंदिन प्रदूषण पातळी तपासण्यासाठी पालिका व परिसर संस्थेतर्फे पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फुफ्फुसाचे बिलबोर्ड (वायू गुणवत्ता दर्शक फलक) 5 जानेवारीला बसविण्यात आला. त्याचे अनावरण आयुक्त शेखर सिह यांच्या हस्ते झाले. हवेतील मुख्य व घातक प्रदूषके असलेल्या पीएम 2.5 आणि पीएम 10 मध्ये अनुक्रमे 70 टक्के आणि 61 टक्के एवढी मोठी वाढ मागील सहा वर्षांमध्ये झाली आहे. माणसांच्या आरोग्यासाठी महासंकट ठरणारी परिस्थिती वातावरणात आहे.