पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात शासकीय संस्थासह नामांकित कंपन्यांचाकडे मिळकतकराची मोठी थकबाकी आहे. तब्बल 148 कोटी 79 लाख 64 हजार 189 रूपयांची थकबाकी असल्याने टाटा मोटर्स कंपनीलाही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने नोटीस बजावली आहे.
एक हजार कोटींची वसुली करण्यासाठी शहरातील थकबाकीदारांकडून थकीत व मूळ मिळकतकर वसुलीसाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने कंबर कसली आहे. थकबाकीदारांच्या मिळकती जप्तीची कारवाई पोलिस बंदोबस्तात केली जात आहे. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवासी व बिगरनिवासी मिळकतधारकांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
मोठ्या थकबाकीदारामध्ये टाटा मोटर्स कंपनीचाही समावेश आहे. कंपनीकडे तब्बल 148 कोटी 79 लाखांचा थकीत कर आहे. त्यासाठी चिंचवड, महापालिका भवन व चिखली विभागीय कर संकलन कार्यालयाने नुकतीच नोटीस बजावली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मिळकती जप्त करून कठोर कारवाई करणारी पालिका या थकबाकीदार कंपनीवर काय कारवाई करते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या पूर्वी उपायुक्त स्मिता झगडे यांनी या कंपनीस तब्बल 200 कोटी थकबाकीप्रकरणी जुलै 2021 ला नोटीस बजावली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ती नोटीस नंतर मागे घेण्यात आली.