पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या माध्यमातून यांनी शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, दिव्यांग अशा सर्व समाज घटकांसाठी वेगवेगळा कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ त्या घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करा. त्यांना त्यांचे लाभ मिळवून द्या. त्याद्वारे त्या विविध वर्गाशी संपर्क साधा, असे आवाहन केंद्रीय राज्य मंत्री जॉन बारला यांनी केले.
केंद्रीय राज्य मंत्री जॉन बारला यांच्या प्रमुख उपस्थित पिंपरी-चिंचवड शहरात अल्पसंख्याक समाजाचा मेळावा नुकताच घेण्यात आला. त्यात ते बोलत होते. चिंचवड येथील द क्लोव्हर हॉटेल येथे झालेल्या मेळाव्यास भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश सचिव जमील औटी, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष वसिम शेख, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे शहराध्यक्ष शाकीर शेख आदी उपस्थित होते.
मेळाव्यानंतर जॉन बारला यांनी शहरातील अल्पसंख्याक समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. जमील औटी यांनी स्वागत केले. वसिम शेख यांनी सूत्रसंचालन केले. शाकीर शेख यांनी आभार मानले