निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांच्यासाठी नवीन मोटार खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या सुमारे पंधरा लाखांच्या खर्चाला बुधवारी (दि. २६) स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
सीमा सावळे स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापौर काळजे यांना पालिकेकडून सरकारी वाहन देण्यात आले होते. ती मोटार नादरुस्त असल्याने बंद पडली. त्यानंतर महापौरांनी पालिकेची मोटार न वापरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी स्वत:च्या खासगी वाहनाचा वापर चालू केला होता. त्यांच्यासाठी अखेर मोटार खरेदी करण्यावर मोहोर उमटली आहे.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यामार्फत मांडलेल्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने हा निर्णय घेतला. त्यामध्ये टोयोटो कंपनीची इनोव्हा मोटार १२ लाख ३९ हजार ८३ रुपयांमध्ये खरेदी केली जाणार आहे. तर, भोसरीतील शरयू मोटर्स किंवा वाय. एम मोटर्स यांच्याकडून मोटारीसाठी आवश्यक ज्यादा सुविधांसाठी २ लाख ६ हजार ६०६ रुपयांचा खर्चही आगाऊ स्वरुपात मंजूर करण्यात आला आहे.