साहित्य ः पुदिन्याची पाने साधारण एक मोठा पेलाभर, साधारण 50 ग्रॅम आले, (पाव चमचा सायट्रिक ऍसिड) पाव वाटी लिंबाचा रस, अर्धी वाटी मोसंबी रस, काळे मीठ साधारण दीड चमचा, तुळशीचे किंवा सब्जा बी दोन मोठे चमचे, साखर चवीप्रमाणे, बर्फाचा चुरा किंवा क्युब्ज.
कृती ः पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून आले आणि पुदिना यांची पेस्ट थोडे पाणी घालून तयार करावी. ही पेस्ट एका कापडाच्या पुरचुंडीत घालून त्याचा फक्त रस एका पातेल्यात काढून घ्यावा. यानंतर यात मोसंबीचा आणि लिंबाचा रस घालावा, थोडी साखर घालून विरघळून घ्यावी. या मिश्रणात एक मोठा पेला पाणी घालून पुन्हा सगळे मिश्रण गाळून घ्यावे. त्यात पाव चमचा सायट्रिक ऍसिड घालावे आणि एका बाटलीत भरून ही बाटली फ्रिजमध्ये ठेवावी. सध्या उन्हाळा सुरू होतो आहे. त्यामुळे जेव्हा सरबत करायचे असेल तेव्हा हे मिश्रण साधारण पाच ते सहा ग्लाससाठी अर्धी वाटी घ्यावे. त्यात काळे मीठ आणि भिजवलेले सब्जा किंवा तुळशीचे बी घालून सर्व्ह करावे. हिरव्या रंगाचे हे अत्यंत चवदार असे सरबत उन्हाळ्यात खूपच उपयुक्त ठरते. पुदिना आणि आले असल्याने पित्तसासाठीही चांगले ठरते.
सजावट ः हल्ली ज्यूससाठी खूप छान आकाराचे काचेचे ग्लास आणि स्ट्रॉ मिळतात. त्यामुळे अशा ग्लासमध्ये हे ज्यूस देताना ग्लासच्या वरच्या बाजूला एखादी गोल चक्ती मोसंबी किंवा लिंबाची लावून देता येते. याचबरोबर पेल्याचा वरचा भाग थोडासा पाण्याने ओला करावा, आणि तो पेला अगदी सावकासपणे ग्लुकोन-डीच्या “लेमन’ फ्लेवरच्या पावडरमध्ये फिरवावा आणि मग हे ज्यूस त्यात काढून सर्व्ह केले तर त्याला एक छान “गेट-अप’ येतो.