निर्भीडसत्ता न्यूज –
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव मोटार धडकून अपघात झाला. या अपघातात आयकर विभागातील एका अधिका-याचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी आहेत. हा अपघात आज (गुरूवारी) पहाटे पाचच्या सुमारास देहूरोडजवळील अमरजाई मंदिराजवळ घडला. अभिषेक त्यागी (आयकर निरीक्षक) असे मृताचे नाव आहे. तर उपसंचालक आनंद उपाध्याय, कृष्णकांत मिश्रा व चालक (नाव समजू शकले नाही) हे तिघे गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाचे काही अधिकारी कामानिमित्त मुंबईहून पुण्याकडे तवेरा मोटारीतून (एमएच 12 एफसी 2615) येत होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिराजवळ लोखंडाचे खांब घेऊन जात असलेला कंटेनर उभा होता. भरधाव तवेरा मोटार या कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात झाला.
या अपघातात एका अधिका-याचा मृत्यू झाला. तर चालकासह तिघे जखमी झाले. देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.