निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही क्षेत्रीय (प्रभाग) कार्यालयांच्या सभापतीपदासाठी भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज दाखल केले. सभापतीपदासाठी शुक्रवारी (दि. २७) निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाणार आहे. यादिवशी आठही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदी भाजप नगरसेवकांची बिनविरोध निवड होईल.
महापालिकेचे आठ प्रभाग समित्या आहेत. प्रत्येक प्रभागात येणाऱ्या नगरसेवकांधून एकाची सभापतीपदी निवड केली जाते. त्या त्या प्रभागात कोणत्या राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचे संख्याबळ किती आहे, यावरच सभापतीपद ठरते. महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केलेल्या भाजपचे आठही प्रभाग समितीत स्पष्ट बहुमत आहे. प्रत्येक प्रभागात भाजपच्या नगरसेवकांचे संख्याबळ जास्त आहे. साहजिकच प्रभाग समिती सभापतीपदी भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागते. दरवर्षी नवीन नगरसेवकाला या पदावर संधी दिली जाते.
भाजपच्या महापालिकेतील सत्तेला एक वर्ष पूर्ण झाले. आठही प्रभाग समिती सभापतींचा एक वर्षांचा कार्यकाळही पूर्ण झाला. त्यामुळे प्रभागांवर नवीन सभापतींची निवड करणे क्रमप्राप्त होते. त्यासाठी प्रशासनामार्फत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
“अ” प्रभाग समिती सभापतीपदासाठी अनुराधा गोरखे, “ब” प्रभाग समिती सभापतीपदासाठी करूणा चिंचवडे, “क” प्रभाग समिती सभापतीपदासाठी नम्रता लोंढे, “ड” प्रभाग समिती सभापतीपदासाठी शशिकांत कदम, “इ” प्रभाग समिती सभापतीपदासाठी भीमाबाई फुगे, “फ” प्रभाग समिती सभापतीपदासाठी कमल घोलप, “ग” प्रभाग समिती सभापतीपदासाठी बाबासाहेब त्रिभुवन आणि “ह” प्रभाग समिती सभापतीपदासाठी अंबरनाथ कांबळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यातील शशिकांत कदम, भीमाबाई फुगे आणि अंबरनाथ कांबळे या तिघांनाही पक्षाने दुसऱ्यांदा प्रभाग समिती सभापतीपदी संधी दिली आहे.