पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सोमवारी (दि.25) तिसर्या दिवशी ही कायम होता. आज एकूण 41 कोरोनाबाधित सापडले. तर, येरवड्यातील एका महिलेचा कोरोनामुळे पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात आज मृत्यू झाला, हॉटस्पॉट ठरलेल्या चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीतील आजही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून आले. तेथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 134 झाली आहे. आज सापडलेले कोरोनाबाधित आनंदनगर तसेच, किवळे, पिंपरी कॅम्पातील भाटनगर व बौद्धनगर, सांगवी येथील आहेत. त्यात 19 पुरूष व 19 महिला असा एकूण 38 जणांचा समावेश आहे. तर, पुण्यातील येरवडा व खेडमधील राजगुरूनगर येथील 2 पुरूष व 1 महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे.
येरवडा येथील कोरोनाबाधित महिलेवर वायसीएममध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. बळीचा एकूण आकडा 17 झाला आहे.
आज 159 संशयितांना वायसीएम व भोसरी रूग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण 103 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. एकूण 5 हजार 510 पैकी 4 हजार 907 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 225 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे.