पुणे : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला गुरुवारी लागलेल्या आगीत 5 जण मृत्यूमुखी पडले. सीरम इन्स्टिट्यूटकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी ही घोषणा केली.
कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे देशासह जगाचे लक्ष पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागले आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्या मजल्यावर आज, गुरुवारी दुपारी आग लागली. त्यानंतर ही आग चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. जवळपास 4 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या दुर्घटनेत 5 जण मृत्यूमुखी पडलेत.
या सर्वांच्या कुटुंबियांना सीरमतर्फे प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यासंदर्भात सीरमचे सीईओ सायरस पुनावाला म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलिकडे जाऊन दुर्घटनेतील मृत्यूमुखींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाखांची मदत जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले.