पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील बिर्ला रूग्णालय ते डांगे चौक या 31 फूट रस्त्याचे पदपथ अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपुजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.15) झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त मिनीनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर व नागरिक उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, या रस्त्यावर वाहनांची व पादचार्यांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या वर्दळीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी हा रस्ता अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प केवळ सुशोभिकरणासाठी नाही. यामुळे वाहतुक सुरळीत होऊन पादचार्यांना, सायकलस्वारांना व वाहनचालकांना सुलभतेने आणि सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी मदत होणार आहे. अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार पदपथ विकसित केल्याने सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग व वाहनतळ या सर्व सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले की, या रस्त्यावर बसण्यासाठी दगडी आसने, जिम साहित्य तसेच, म्युरल, पॅराबोला आदी सुविधा महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहेत. रात्री पादचारी मार्गावरील चांगल्या दृश्यमानतेसाठी अत्याधुनिक पथदिवेही बसविण्यात येणार आहेत. जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी सुत्रसंचालन केले.