निर्भीड न्यूज –
उन्हाचा तडाखा आणि दुष्काळामुळे सर्वत्र सध्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. ही बाब लक्षात घेऊन पिंपळे सौदारग येथील रोझलॅंड रेसीडेन्सी, गेट क्रमांक 4 या हाऊसिंग सोसायटीतर्फे अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सोसायटीतील विद्यार्थ्यांच्या बाटलीतील उरलेले पाणी सोसायटीतील झुडपांना आणि झाडांसाठी उपयोगात आणले जात आहे.
पर्यावरण रक्षणासाठी या सोसायटीच्या वतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. सोसायटीच्या या उपक्रमांची शासन आणि काही संस्थांकडून दखल घेण्यात आली असून, त्याबाबत सोसायटीचा गौरवही करण्यात आला आहे.
पिंपळे सौदागर येथील हॉटेल शिवार गार्डन चौक ते कुणाल आयकॉन हाऊसिंग सोसायटी दरम्यान असलेल्या या रोझलँड रेसीडेन्सी, गेट क्रमांक चार या सोसायटीत सुमारे एक हजार सदनिका आहेत. सुमारे एक हजार सभासद या सोसायटीचे आहेत. या सर्व सभासदांचा या अभिनव उपक्रमात सहभाग असतो.
राज्यातील दुष्काळ आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पाणी वाचविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. यातील एक म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाटलीतील शिल्लक राहिलेले पाणी झाडा-झुडपांसाठी उपयोगात आणणे. विद्यार्थी शाळेत जाताना पिण्यासाठी बाटलीत पाणी घेऊन जातात. यातील बहुतांश पाणी बाटलीतच शिल्लक राहते. विद्यार्थी शाळेतून घरी परतल्यावर बाटलीतील शिल्लक पाणी फेकून दिले जाते. त्यामुळे या पाण्याचा कोणत्याही प्रकारचा वापर न होता मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.
विद्यार्थ्यांच्या बाटलीतील हेच पाणी झाडा-झुडपांना वापरल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येईल. त्यासाठी सोसायटीतील सभासदांनी पुढाकार घेतला. सोसायटीतील प्रत्येक झाडाच्या बुंध्यालगत पाण्याची मोठी बाटली ठेवण्यात आली. या बाटलीत विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी बाटलीतील शिल्लक राहिलेले पाणी टाकायचे. त्यामुळे ठिबक पध्दतीने झाडाला पाणी मिळेल. सोसायटीचे चेअरमन संतोष मसकर यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी जितेंद्र चौधरी, प्रशांत ढाकळे, आनंद दप्तरदार, रमेश दौंड, हरिष रामचंदानी, नरेंद्र अहिरे, हरिष राव, प्रितम मोहंती यांच्याकडून सोसायटीतील सभासदांमध्ये या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.