निर्भीड न्यूज –
विविध कामगार संघटनांनी एकत्र येत पिंपरीत सोमवार, दि. 11 एप्रिल रोजी आंदोलन केले. भाजपा सरकारने प्रस्तावित केलेल्या कायदा कामगारविरोधी असल्याचा आरोप करत या प्रस्तावित कामगार कायद्याची या वेळी होळी करण्यात आली.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौकात आंदोलन झाले. श्रमिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष दिलीप पवार यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकळे, उपाध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, शाम चक्रनारायण, खजिनदार संतोष रांजणे, संजय कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
पवार या वेळी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार निर्मितीच्या ”गोंडस” नावाखाली औद्योगिक कलम कायदा व कंत्राटी कामगार कायद्यामध्ये बदल करण्यासाठी कामगार सचिवांना पत्र पाठवले आहे. या कायद्यात बदल करून भाजप सरकार मालकधार्जिणे कायदे आणण्याचा प्रयत्न करत आहे. हे कायदे पारित केल्यास मालकवर्गाकडून कामगारांवर अन्याय करण्यात येईल. या कायद्यात बदल केल्यास कामगार देशोधडीला लागणार आहे; तसेच कायमस्वरुपी कामगार पध्दत बंद होईल.
बजाज ऑटो, अॅटलास कॉप्को, केएसबी, थरमॅक्स, मॅथर, प्लॅनर, पद्मजी पेपर मील, चाकण येथील गुपोअॅन्थोलीन, लोबर, सनसेरा, सुपरिजत, हुंद्याई, सुझलान, व्होरॉक, हिंजवडी येथील लाइरिंग, भारत फोर्स, जेजुरी येथील कोनी क्रेन्स इंडिया आदी कामगार संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.