निर्भीड न्यूज –
लोकसभेच्या 2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेविका शारदा बाबर यांनी पक्षविरोधी काम केले होते. त्यामुळे शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर नगरसेविका बाबर यांनी ‘भाजपा’चे उंबरठे झिजवले; मात्र त्यांना भाजपात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे पुन्हा शिवसेनेत परतण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यानर प्रभाग क्र. 8 साठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनेही या निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरविला आहे. शिवसेनेकडून राम पात्रे निवडणूक लढवित आहेत.
खासदार श्रीरंग बारणे यांनी या पोटनिवडणुकीच्या प्रचारात शिकस्त पणाला लावली आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन शारदा बाबर आणि त्यांचे पती प्रकाश बाबर यांनीही या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा प्रचार सुरू केला आहे. नगरसेविका बाबर यांच्याकडून शिवसेनेचा प्रचार उत्स्फूर्तपणे केला जात आहे. असे असले तरी शिवसेनेचे उमेदवार राम पात्रे यांच्याबाबत मतदार काय निर्णय देणार हे निवडणूक निकालातून समोर येईल. या निकालानंतरच नगरसेविका बाबर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे नगरसेविका शारदा बाबर, सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर बाबर, सावळे आणि शेंडगे या तीनही नगरसेविका काही दिवस एकत्र होत्या. नगरसेविका सावळे आणि शेंडगे यांनी भाजपाची वाट धरली आहे. दरम्यान शारदा बाबर या सीमा सावळे आणि आशा शेंडगे यांच्यापासून दुरावल्याचे चित्र आहे.