निर्भीडसत्ता न्यूज –
दिल्ली येथे पार पडलेल्या ‘ऑल इंडिया इंडिपेंडेन्स कप’ या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या बुद्धभूषण गायकवाड याने वरिष्ठ गटात शेवटच्या सामन्यात आसाम रायफल या पॅरा मिलिटरी फोर्सच्या पवन चौहानचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले.
या स्पर्धेस संपूर्ण देशातून सुमारे 3500 स्पर्धक आले होते. त्यात भारतीय सैन्यदल, आसाम रायफल, सीआरपीएफ, आयटीबीपी व भारतीय खेल प्राधिकरण (मध्यप्रदेश) यांचा समावेश होता. बुध्दभूषण गायकवाड हा सेइको काई कराटे इंटरनॅशनल या संस्थेमार्फत या स्पर्धेत सहभागी झाला होता. कराटे असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय महासंघाचे प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच अविनाश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 10 वर्ष सराव करीत आहे. बुध्दभूषण गायकवाड हा पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात कला विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग लोहोटे, मराठी विभाग प्रमुख डॉ. संजय मेस्त्री, विद्यासागर वाघेरे यांनी त्याचे अभिनंदन केले.