नवे धोरण लवकरच आयुक्तांना सादर करणार; उपमहापौर तुषार हिंगे यांची माहिती
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे एकूण 19 सार्वजनिक वाचनालय आहेत. वाचकांच्या कमी प्रतिसाद असलेले वाचनालय बंद करण्याचे नियोजन आहे. ज्या भागांत वाचनालय नाहीत तेथे ते सुरू केली जातील. त्यानुसार नव्याने वाचनालय धोरण तयार करण्यात येत आहे, असे उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी सांगितले.
सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या कामकाजासंदर्भातील आढावा बैठक उपमहापौर हिंगे यांच्या अध्यक्षस्थानी महापालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात नुकतीच झाली. या वेळी क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त संदीप खोत, नगरसचिव उल्हास जगताप, ग्रंथपाल आणि अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीसंदर्भात उपमहापौर हिंगे यांनी सांगितले की, महापालिकेचे शहरात एकूण 19 सार्वजनिक वाचनालय आहेत. त्यापैकी निगडी, काळभोरनगर, शाहूनगर, संत तुकारामनगर येथील वाचनालयास कमी प्रतिसाद आहे. कमी वाचक प्रतिसाद असलेल्या वाचनालय बंद करण्याचे करण्याचे नियोजन आहे. ज्या भागांत वाचनालय नाही, त्या ठिकाणी नव्याने वाचनालय सुरू केली जातील. त्यामुळे पालिकेचे मनुष्यबळाचा योग्य प्रकारे वापर होईल. या संदर्भात लवकरत नवे धोरण तयार केले जाणार आहे.
तसेच, शहरात असलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रात आताच्या गरजेनुसार नवनवी पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. तेथे शाळाप्रमाणे दरवर्षी जूनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. एक वर्ष कालावधीसाठी आता 1 हजार रूपये आगाऊ ठेव आणि दरमहा 100 रूपये शुल्क आहे. ठेव परत करताना अनेक अडचणी विद्यार्थ्यांना येतात. त्या दूर करण्यासाठी केवळ 500 रूपये आगाऊ ठेव घेतली जाणार आहे. ती परत केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
वाचनालय व स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अटी व नियमात बदल केले जाणार आहेत. तसे नवे धोरण तयार करण्यात येत आहे. या संदर्भात ग्रंथपालाशी चर्चा करून धोरणास अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. तो मंजुरीसाठी आयुक्तांसमोर सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.