पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपकडून नगरसेवक संतोष लोंढे यांनी सोमवारी (दि. २) उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. स्थायी समितीमध्ये १६ पैकी भाजपचे ११ सदस्य असल्यामुळे संतोष लोंढे यांच्या सभापतीपदी निवड निश्चित आहे. ती बिनविरोध होते की निवडणूक होणार हे येत्या शुक्रवारी (दि. ६) स्पष्ट होईल.
फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणूक पार पडली. या पंचवार्षिकमधील महापालिकेचे हे चौथे वर्ष सुरू झाले आहे. महापालिकेत भाजप स्पष्ट बहुमतासह सत्ताधारी असल्यामुळे सर्वच पदांवर भाजपच्याच नगरसेवकांची वर्णी लागते. स्थायी समिती ही महापालिकेच्या तिजोरीची चावी मानली जाते. या समितीच्या सभापतीकडे ही चावी असते. भाजपने स्थायी समिती सभापती निवडताना गेली तीन वर्षे सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविला. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी मागासवर्गीय समाजातील महिल नगरसेविकांना स्थायी समिती सभापतीपदी संधी भाजपने दिली. तिसऱ्या वर्षी ब्राह्मण समाजातील नगरसेवकाला स्थायी समिती सभापती केले. आता चौथ्या वर्षी भोसरी विधानसभा मतदारसंघातील संतोष लोंढे यांना स्थायी समिती सभापतीपदासाठी संधी देण्यात आली आहे.
संतोष लोंढे हे माळी समाजातील आहेत. त्यांनी सोमवारी सभापतीपदासाठी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे मावळते सभापती विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेविका भीमबाई फुगे, सुवर्णा बुर्डे आदी उपस्थित होते.
स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. त्यातील ११ सदस्य हे भाजपचे आहेत. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदी भाजपच्या संतोष लोंढे यांची निवड निश्चित झाली आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादीचे ४ आणि शिवसेनेचा एक सदस्य आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक पंकज भालेकर यांनी स्थायी समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. येत्या शुक्रवारी ६ मार्च रोजी सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतल्यास संतोष लोंढे यांची बिनविरोध निवड होईल. अन्यथा निवडणुकीद्वारे लोंढे यांची सभापतीपदी निवड निश्चित आहे.