सवलतीचा लाभ घेण्याचे आयुक्त शेखर सिंह यांचे आवाहन
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका इलेक्ट्रीक वाहने वापरणार्यांना प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा अधिक वापर होण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणार्या मिळकतधारकांना किंवा हाऊसिंग सोसायटीला मिळकतकरात 2 ते 5 टक्के अशी सूट आहे. त्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
शहराची लोकसंख्या वाढत असताना शहर चारही बाजूने वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्यस्थितीत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाकडे (आरटीओ) 23 लाख 92 हजार 521 वाहनांची नोंद असून शहराची लोकसंख्या 30 लाखांवर आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येचा आलेख दिसून येत आहे. दुसरीकडे वाहनांची संख्या सातत्याने वाढत असतानाच पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे प्रदुषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे.
त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने 20 ऑगस्ट 2021 ला इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर करून, महापालिकांना या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या आदेशाची पालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी 1 जानेवारी 2022 ला अंमलबजावणी करण्याचे आदेश कर संकलन विभागाला दिले होते, अशी माहिती सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. त्यानुसार इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणार्या मिळकतधारकांना 2 टक्के आणि हाऊसिंग सोसायटीला त्यांच्या सामायिक मालमत्ता जसे की जीम, क्लब हाऊस 5 टक्क्यांची सवलत असणार आहे.