पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने सन 2023-24 या आर्थिक वर्षांत 18 कोटी 61 लाख 93 हजार 904 रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 1 कोटी 38 लाख अधिकने उत्पन्न महापालिका तिजोरीत जमा झाले आहे, अशी माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.
आकाशचिन्ह व परवाना विभागाने गेल्या वर्षी सन 2022-23 या आर्थिक वर्षांत एकूण 17 कोटी 24 लाख 48 हजार 675 रूपयांचे उत्पन्न मिळविले होते. यंदा या विभागास 17 कोटी 52 लाख 5 हजारांचे उद्दिष्ट आयुक्त शेखर सिंह यांनी ठरवून दिले आहे. उपायुक्त संदीप खोत यांनी या विभागाची जबाबदारी घेतल्यापासून थकबाकी व परवाना शुल्क वसुलीवर अधिक भर देण्यात आला आहे. विभागाच्या बीट निरीक्षकांकडून थकबाकीदारांकडून वसुली तीव्र करण्यात आली होती. त्यामुळे यंदा या विभागाचे उत्पन्न वाढले आहे. यंदा प्रथमच महापालिकेचे उत्पन्न 18 कोटींच्या पुढे गेले आहे.
परवाना शुल्क न भरणार्या जाहिरात होर्डिंगचालकावर दंडात्मक कारवाई या पुढेही केली जाणार आहे. परवाना नसलेल्या होर्डींगचालकांना 10 ते 25 टक्के दंड केला जाणार आहे. प्रसंगी ते अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई केली जाणार आहे, असे उपायुक्त खोत यांनी सांगितले.