- दोन हजार 200 पैकी 300 पेक्षा अधिक लोखंडी पाईपचे स्थंलातर
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
या प्रकल्पाचे काम 9 ऑगस्ट 2011 पासून बंद आहे. एकूण 34.71 किलोमीटरपैकी 4.40 किलोमीटर अंतराची भूमिगत समांतर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या कामाची स्थगिती 8 सप्टेंबर 2023 ला राज्य शासनाने उठविली आहे. त्यापूर्वीच महापालिकेने या कामाचा नव्या स्थितीनुसार आराखडा बनविण्यासाठी सल्लागार नेमला आहे. मात्र, नव्याने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नाहीत.
दरम्यान, हे काम सुरू करताना 1,800 मिलिमीटर व्यासाचे लोखंडी पाईप मावळ तालुक्यातील अनेक गावांतील खासगी जागेत ठेवण्यात आले आहेत. एकूण 2 हजार 200 लोखंडी पाईप आहेत. तसेच, 244 व्हॉल्व्ह, 6 पंप्स, 12 विद्युत मोटर्स, विद्युतविषयक 50 व्हॉल्व्ह, 32 ट्रॉन्सफार्मर व इतर विद्युतजोडणीचे साहित्य बंदिस्त गोदामात ठेवण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने सुरक्षारक्षक ही नेमले आहे. जागामालकांना भाडे दिले जात आहे.
लोखंडी पाईप व यंत्रसामुग्री रावेत येथील महापालिकेच्या जागेत आणून ठेवण्याचा निर्णय तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात झाला. ते काम दापोडी येथील जलसंपदा कार्यशाळेस देण्यात आले. मात्र, त्यांनी त्या कामास नकार दिला. त्यानंतर त्या कामाची निविदा काढण्यात आली. ते काम 15 फेबु्रवारी 2024 ला बालाजी इंजिनिअर्सला देण्यात आले आहे. या कामाची मुदत 3 महिने होते. दरम्यान, जागामालकांनी भाडे दिल्याशिवाय पाईप व साहित्य उचलण्यास नकार दिला. भाडे देण्याबाबतची महापालिकेने शाश्वती दिल्यानंतर ते काम सुरू झाले आहे.
सर्व पाईप जूनपर्यंत रावेत येथे आणून ठेवणार
मावळ तालुक्यातील खासगी जागेत लोखंडी पाईप व यंत्रासामुग्री ठेवण्यात आलेली आहे. ते पाईप व साहित्य रावेत येथील गायरान जागेत आणून ठेवण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत 300 पेक्षा अधिक पाईप आणून ठेवण्यात आले आहेत. सर्व 2 हजार 200 पाईप पावसाळा सुरू होण्यापूर्वी रावेत येथे आणून ठेवण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.