देहूगाव : वैष्णवांचे दैवत असलेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमण सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या काना- कोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी जगद्गुरूंना आज दुपारी बारा वाजता श्री क्षेत्र देहूगाव येथे अभिवादन केले.
गेली काही दिवसापासून अगोदरच अनेक ठिकाणच्या दिंड्या देहूत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापूजा, हरिपाठ व वीणा- टाळ -मृदंग यांच्या साथीत भजन कीर्तन व हरिनामाच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमून निघाला होता.
तुकाराम बीजेच्या दिवशी भाविकांनी रात्रीपासूनच येण्यास सुरवात केली होती. पहाटे तीन वाजल्यापासूनच पांडुरंगाच्या व श्री संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिरात दर्शनासाठी रांगेत उभे होते. सकाळी आठ वाजल्यापासून वैकुंठगमण मंदिराच्या परिसरात भरणा-या वैष्णवांच्या मेळाव्याकडे वारक-यांची पाऊले पडत होती. संस्थानच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला पहाटे तीन वाजल्यापासून सुरुवात झाली.