निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त व ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत यांची अक्कलकोट नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यामुळे त्यांना पालिकेतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्याच्या विभागाचा तात्पुरता पदभार सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पालिकेचा क्रीडा विभाग निष्क्रीय म्हणून बदनाम आहे. त्याला शिस्त लावण्याचे काम राऊत यांनी त्यांच्याकडे क्रीडा विभाग आल्यानंतर सुरू केले होते. त्या अंतर्गत त्यांनी अनेक बेशिस्त कर्मचारी व अधिकार्यांवर कारवाई करीत वठणीवर आणले होते. त्यामुळे क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचार्याची शिस्त पाळत काम करीत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले होते. त्याच्या गतीमान व शिस्तबद्ध कामकाजामुळे त्याच्याकडे केवळ क्रीडा विभागाची जबाबदारी देण्याच्या हालचालीना वेग आला होता. असे असताना त्याची अचानक बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवारच्या (दि.24) आदेशानुसार राऊत यांची सोलापूर जिल्हातील अक्कलकोट नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली केली आहे. सदर आदेशानुसार पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याना पालिका सेवेतून कार्यमुक्त केले आहे. त्यांच्या विभागाचा तात्पुरता पदभार सहायक आयुक्त आष्टीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे शिस्तीबद्ध अधिकार्याची बदली
आशा राऊत यांना महापालिकेत रूजू होऊन जेमतेम वर्षभराचा कालावधी झाला. क्रीडा विभाास शिस्त लावण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे क्रीडा विभागात बदल होतील, अशी अपेक्षा पालिका प्रशासनासह नगरसेवक, पदाधिकारी व क्रीडाप्रेमींना लागली होती. मात्र, कालावधी पूर्ण न करताच अचानक असा शिस्तीबद्द अधिकार्याची बदली झाल्याने राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.