निर्भीड न्यूज –
काळेवाडीसह परिसरात रस्ते मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाले आहेत. हे खड्डे बुजवून रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अन्यथा या खड्ड्यांमध्ये बसून लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.
तापकीर यांनी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांना याबाबत निवदेन दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, विविध कारणांस्तव पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेतर्फे ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे; मात्र याबाबत महापालिका प्रशासनात समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे खोदकामानंतर दुरुस्ती न झाल्याने रस्त्यांवर खड्डे तयार झाले आहेत.
काळेवाडी येथील तापकीरनगर, श्रीनगर भागात रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. महापालिकेच्या ड्रेनेज आणि पाणीपुरवठा विभागात समन्वय नसल्याने मनमानी पध्दतीने कुठेही खोदकाम केले जाते. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले असून, पादचा-यांनाही या रस्त्यांवरून ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.